रानभाज्या
रानभाज्या म्हणजे जंगलात, शेतात किंवा इतर ठिकाणी












नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या.
पावसाळ्यात या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
रानभाज्यांचे महत्त्व:
नैसर्गिकरित्या उगवतात:
रानभाज्या कोणत्याही रासायनिक खताशिवाय नैसर्गिकरित्या वाढतात, त्यामुळे त्या विषमुक्त असतात.
आरोग्यासाठी फायदेशीर:
अनेक रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात आणि विविध आजारांवर त्या गुणकारी ठरतात, असे निसर्गाशालेने म्हटले आहे.
पर्यावरणासाठी महत्त्वाच्या:
रानभाज्या खाल्ल्याने जंगलातील वनस्पतींचे संरक्षण होते आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
स्थानिक संस्कृतीचा भाग:
रानभाज्या खाणे ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक पारंपरिक पद्धत आहे.
उदाहरणे
1) वाघाटीची भाजी
महाराष्ट्रात आषाढी एकादशीला वाघाटीच्या कोवळ्या फळांची भाजी करण्याची प्रथा आहे. धातू पुष्ट होण्यास ही भाजी उपयोगी पडते. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाल्याने उत्पन्न होणाऱ्या लक्षणात वाघाटी भाजीच्या सेवनाने फायदा होतो.
मुरटाची भाजी
जुलै महिन्यात पावसाचा जोर खुपच जास्त असतो आणि त्याच वेळी घनदाट वर्षारण्यामध्ये मुरटाची भाजी नावाची एक अप्रतिम भाजी मिळते. वरकरणी नेच्यासारख्या दिसणा-या या वनस्पतीच्या कोवळ्या शेंड्यांची भाजी केली जाते. मी खाल्लेल्या रानभाज्यांमध्ये मला सर्वात जास्त आवडलेली रानभाजी हीच.
पाथरी / पथरीची भाजी
मावळातील रानभाज्या
हि भाजी सर्वत्र आढळते. नुसतीच मावळ भागात नाही तर विदर्भ मराठवाड्यात देखील ही भाजी विपुल प्रमाणात पावसाळ्यात उगवते. पतरी, पात्र अशा विविध नावांनी हिला ओळखले जाते. किडनी , मूत्र संबंधित व्याधीसाठी उपयुक्त . तसेच पुरुषत्व , जोम वाढवते असा देखील समज स्थानिकामध्ये आहे.
सुदृढ व्यक्तींनी कच्ची खावी . अशक्त, रुग्ण व्यक्तींनी 3/4 पानांचा मिक्सरमध्ये अथवा वाट्यावर वाटुन रस करून सकाळी प्यावा. मुगडाळ टाकून कोरडी भाजी छान होते .पावसाळ्यात मोकळ्या जागेत, डोंगर उतारावर, निच-याच्या जागेमध्ये ही भाजी उगवते.
टिप…. अशाच आकाराची पाने असलेल्या वनस्पती कडवट & विषारी पण आहेत . नेहमी खाणारे / ग्रामीण भागातील पारखी व्यक्तींकडून खातरजमा करून मगच खावी .
शेंडवेलाची (चाई) भाजी
खरतर या वेलीचे नाव शेंडवेल नाहीये. याला म्हणतात चाईचा वेल. पण पुण्याच्या पश्चिम भागात सर्रास शेंडवेल हेच नाव प्रचलित आहे. या वेलीच्या प्रत्येक घटकाची रुचकर भाजी बनविली जाते. लुसलुशीत कोवळे शेंडे की जे पावसाळ्याच्या सुरुवातीस येतात याची भाजी खुपच छान होते. मी स्वतः ही भाजी खाल्ली आहे. खाली फोटो पहा. वेलीच्या शेंड्यांव्यतिरिक्त याच्या फुलांची की ज्याला चाईचा मोहोर असे म्हणतात व कंदांची देखील भाजी केली जाते. पण फुले/मोहोर पावसाळा संपताना मिळतात.
अंबाडी – लाल अंबाडी
महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी ही रानभाजी स्वादिष्ट आहे. गावोगाव शेताच्या बांधांवर देखील पुर्वी या भाजीचे तांडे दिसायचे. गेल्या काही दशकात विषारी रासायनिक खतांनी या भाजीचा बिमोड केल्यासारखे झाले आहे. घाटमाथ्यावर मात्र अजुन ही ही भाजी सापडते.
“विदर्भात अंबाडी ल लक्ष्मी चे प्रतीक मानतात. अंबा म्हणजे लक्ष्मी पूर्वी प्रतेक घरात थोडी तरी अंबाडी वाळवून साठवून ठेवण्याची पद्धत होती वर्षभर ती वापरत असत धार्मिक कार्यक्रमात नैवद्य त अंबाडीची भाजी आर्जून असायची .भंडाऱ्यात अंबाडी भाजी चने घुग्ऱ्या.घरी गायी,म्हशी अस्याच्या ,गाय व्याल्या नंतर जार पडन्या करिता चना डाळ आणि अंबाडी भाजी गायी स खावू घालत. अंबाडी चे पानाच्या भाकरी,भाजी पाणाची चटणी,बियांची चटणी, लाल बोंडी ची चटणी बियांचे तेल आणि शेवटी अंबाडीच्या झाडाचं ताग आणि त्याचे दोर ,दोऱ्या अंबाडी पासून करत असत. अंबाडीची हिरवे पान उकडून हिरव्या मिरच्या मिक्स करून वाटतात छान चटणी होते “, धनंजय मिसाळ यांचेकडुन मिळालेली माहिती.
विदर्भात अंबाडीच्या भाजीच्या भाकरी पण करतात.हिरवा मिरचीच्या ठेच्यासोबत खूप छान लागतात.
भाजी पाण्यात शिजवून घ्यायची.ते पिठात मिसळायचे. खूप वर्षांपूर्वी दुष्काळात गरिबांना ज्वारी वगैरे धान्य मिळायचे नाही.त्यामुळे त्यात अंबाडीची शिजवलेली भाजी मिसळून कमीत कमी पिठात जास्तीत जास्त भाकरी.असे करून पुरवायचे.कधी कधी नुसतीच अंबाडीची भाजी खाऊन वेळ काढायची. तामिळनाडूमध्ये अंबाडीच्या पानांची चटणी आवर्जून आहारात असते. कशी करतात माहीत नाही.अंबाडी मेंदूसाठी फार चांगली.बुद्धिवर्धक आहे. अंबाडीच्या लाल बोंड्यांची चटणी,सरबत, जेली तर फारच उत्तम.पण लाल बोंड्यांची अंबाडी वेगळी असते.त्याची पाने वापरताना मी बघितले नाही. – डॉ अरुण मानकर यांजकडुन मिळालेली माहिती.
चिचारडी
चिचार्डे – रानभाजी
वेल्हे भागात, आमच्या कॅम्पसाईटवर सहज सापडणारी ही राज-फळ भाजी , ग्रामीण लोकांच्या मते मधुमेहाच्या इलाजासाठी वापरली जाते. मी स्वःत एक दोनदा चिचार्डीचीच्या फळांची भाजी खाल्ली आहे. कच्चे फळा देखील खाल्ले तरी चालते. याची चव थोडी कडवट असते पण चांगले वाफलुन घेऊन लपथपीत किंवा नुसती फ्राय भाजी केली तरी स्वादिष्ट लागते. याची भाजी करायची आणखी एक पध्दत आहे. हिरवी मिरची व लसूण घालून ठेचुन घेऊन तव्यावर परतून तव्यावर परतुन घ्यायची. ठेचा देखील केला जातो.
करटुले / फांगळा
रानभाजी करटुली / काटवेल / कंटोले
कर्टुली ही ,रानभाजी आहे.कारल्याच्या जातकुळीमधली आहे पण कङू नसते .यालाच रानकारलीसुध्दा म्हणतात. मंङईमधे सहज उपलब्ध नसते.पावसाळी मोसमातच येते. शक्यतो नैसर्गिक स्वरूपातच चांगली लागते,कमीत कमी मसाले वापरुन याची भाजी करावी.
भारंगी
भारंगीची झुडपे डोंगरउतारावर, खुरट्या जंगलात नदीनाल्यांच्या काठावर, शेतात सर्वत्र आढळतात. पावसाळ्याच्या अखेरीस भारंगीस फुले, फळे येतात. मुळांच्या सकर्सपासून व बियांपासून भारंगीची लागवड करता येते. या पावसाळ्यात (२०२१) मी स्वतः पानांची भाजी करुन खाल्ली.
भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरतात. सर्दी व घशातील शोष यावर भारंगमूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर देतात.
– दम्यावर भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा व अडुळसाची पाने यांचा काढा करून देतात.
भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरतात. याच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा उपयोग होतो.
– पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त ठरते. कारण ती पाचक आहे.
– पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून, त्यातील पाणी गाळून प्यावे. पोट जड असणे, तोंडाची चव गुळचट असणे, तोंडात चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूज जाणवणे, अनुत्साह, हवेच्या बदलाने सर्दी होणे, कफ घट्ट होणे, अशा वेळी भारंगीच्या पानांची भाजी हिंग व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीबरोबर खावी.
– भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात.
चिवळी
घोळ, चिवळ रानभाजी
रानावनात, शेतात, बांधांवर अगदी मुबलक प्रमाणात आढळणारी ही आणखी एक लज्जतदार भाजी आहे. चिवळी , रानघोळ किंवा खाटेचौनाळ अशा वेगवेगळ्या नावांनी ही भाजी ओळखली जाते विविध प्रदेशांमध्ये.
ही भाजी कर्करोग प्रतिबंधक आहे असे काही संशोधनातुन समोर आले आहे. मुळव्याधावर देखील या भाजीचा चांगला उपयोग होतो.
पावसाळ्यात अगदी ऑक्टोबर अखेर पर्यंत भरपूर मिळते.ही वनस्पती जमिनीवर पसरते.जिथे डोळे आहेत तिथून मूळे फुटतात. याची फुले लक्ष वेधुन घेतात.
ही वनस्पती मे अखेरीस दिसायला लागते.आपण ही वनस्पती नक्की पाहिली असणार.परंतु हीच ती हे सर्वना माहीत असेल असे नाही.ऑक्टोबरअखेर पर्यंत दिसते,नंतर हळू हळू दिसेनाशी होते. पाणी घातले तर कशी बशी नाइलाजाने जगते.पुन्हा पुढील पावसाळ्यात तिचे आगमन होते.
कोवळी पाने व खोड याची भाजी केली जाते. ही पाने इतर भाजीच्या पानांमध्ये मिक्स करून भाजी केली जाते. जेव्हा तुम्हाला भाजी अगर भजी करायची असतील तेव्हा भाजी खुडून घ्या.त्यामुळे झाडाला भरपुर फूट येते. हिच्या पानांची भजी करतात. भजी फार रुचकर लागतात.टंब फुगतात.तेल राहात नाही.बेसन पीठ फार कमी लागते. दुष्काळी भागात ही वनस्पती खाद्य म्हणून वापरली जाते.
ही वनस्पती म्हणजे जीवनसत्त्वे व खनिजे यांचा खजिना आहे. हिचे सेवन केल्यामुळे तुम्ही निरोगी राहता. सर्व आजार तुमच्यापासून लांब पळून जातात. जनावरांना चारा म्हणून पण हिचा वापर केला जातो.त्यामुळे जनावरे दूध जास्त देतात.केना
या वनस्पतीचे औषधी उपयोग खालील प्रमाणे आहेत
पानांचा रस अतिसारावर उपयोगी आहे.
या भाजीच्या सेवनामुळे घसा खवखवणे, दुखणे कमी होते.
डोळ्याचे व त्वचेचे विकार कमी होण्यास मदत होते.
हिची भाजी खाण्याने किंवा रस पिण्याने काविळीची तीव्रता कमी होते
ही वनस्पती उत्तम रेचक म्हणून उपयोगी पडते.
त्वचेची जळजळ कमी होते
भाजलेल्या ठिकाणी पेस्ट करून लावल्यास जखम भरून येण्यास मदत होते.
पाय दुखत असतील तर पानांचे पोटीस करून बांधावे.
मुळाचा रस सेवन केल्यास पोटविकार कमी होतात.
सर्पदंशावर या वनस्पती चा रस लावल्यास त्रास कमी होतो.
कावीळ,ताप, डोके दुखणे यावर उपयोग होतो.फुलांचा रस डोळ्याच्या विकारावर वापरला जातो
फुलापासून पुर्वी देखील रंग बनवला जायचा.
या व्यतिरिक्त अन्य देखील असंख्य भाज्या रानावनात आहेत, आपले वनवासी बांधव आजही या भाज्यांचा उपयोग करतात. इथुन पुढे जमेल तसे जमेल तेव्हा नवीन माहिती मिळाल्यास इथे शेयर करीत राहील.
टाकळा
टाकळा ही एक बहुगुणी वनस्पती आहे. हिला बहुगुणी म्हणण्याचे कारण असे की या वनस्पतीचे सर्व भाग उपयोगी आहेत.ही वनस्पती आयुर्वेदिक औषधे करण्यासाठी वापरली जाते.
टाकळा रानभाजी
वनस्पतीचे नाव :- टाकळा
Cassia tora हे तिचे शास्त्रीय नाव. ही एक पावसाळ्यात मिळणारी रानभाजी आहे. हिला तखाटा या नावाने देखील ओळखले जाते. १९ व्या शतकात रानभाज्या खाण्याचे प्रमाण खूप होते.या भाज्या नैसर्गिकरित्या खूप उगवलेल्या असायच्या.लोक आवडीने खात असत. वाढते शहरीकरण व जंगलाचा ह्रास यामुळे या भाज्या दुर्मिळ होत चालल्या आहेत.याचं संवर्धन होण्याची गरज आहे.हा आपला अमुल्य ठेवा आहे. नवीन पिढीला या रानभाज्याची फारशी माहिती नाही.माहीती करून घ्यायला हरकत नाही.
टाकळा ही वनस्पती प्रामुख्याने पावसाळ्यात उगवते. ही भाजी पडीक किंवा ओसाड जमीन, शेतात, बागांमध्ये, जंगलात, रस्त्याच्या कडेने कुठेही वाढते. ही भाजी साधारण एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. याला पिवळसर रंगांची फुलं येतात. पान द्विलिंगी असून रात्रीच्या वेळी ती मिटतात. ही पानं लांबट-गोल किंवा अंडाकृती असतात. काळसर किंवा करडया रंगाच्या शेंगा असून त्यांचं टोक आडवे कापल्यासारखं असते.मात्र आवरण कठीण असते. या वनस्पतीचा वास उग्र असतो.
उपयोग
Leaves are reported to have antirheumatic properties.
Decoction of leaves is used as an excellent laxative.
Seed Powder is used in Ayurvedic Medicines
याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.फक्त पानांचीच नाही तर शेंगाचीही भाजी करतात.
भाजी पचायला हलकी, उष्ण,तिखट व तुरट असते.
सर्व प्रकारच्या त्वचारोगांमध्ये ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे.
भाजी किंवा बियांचा लेप वाटून तो त्वचाविकारावर लावावा.उपयोग होऊ शकतो.
पाने आणि बियांमध्ये कायझोजेनिक आम्ल असून ते त्वचाविकारावर अतिशय गुणकारी आहे.
त्वचा जड झाल्यास ही वनस्पती खाल्ल्याने विशेष उपयोग होतो.
याशिवाय इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात.
लिंबाच्या रसात मुळे उगाळून ती गजकर्णासाठी वापरतात.
पानांचे भाजीच्या रूपात सेवन केल्याने पोटातील कृमी नष्ट होतात असे म्हणतात.
दात येणा-या लहान मुलांना ताप येतो. अशा वेळी टाकळ्याच्या पानांचा काढा त्यांना दिल्याने तापावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला आदी विकारांवर पानाचा रस मधातून द्यावा. आराम पडतो.
टाकळ्याची भाजी ही मुळात उष्ण असल्यामुळे शरीरातील वात आणि कफदोष कमी होण्यास मदत होते.
या भाजीचे वरचेवर सेवन केल्याने शरीरात अतिरिक्त मेद कमी होण्यास मदत होते.
पचायला हलकी, तुरट आणि मलसारक आहे.
पावसाळ्यात शरीराला सुटणारी खाजही कमी होते.
तेव्हा या बहुगुणी रानभाजीचा शोध घ्या.तुम्ही जिथे राहता त्या भागात नक्की मिळेल.
टाकळ्या विषयीची माहिती व फोटो श्री. वसंत पाटील यांचेकडुन मिळाले. त्यांचे शतशः आभार! त्यांचा मोबाईल क्रं. – 9371629799
फोडशी / कोलु
सह्याद्रीचा डोंगर न डोंगर पावसाळ्यात हिरवा होऊन जातो. कधी कधी तर दगड धोंडे, खडक, कातळांवर देखील गवतचे तुरे डोलु लागतात. हि हिरवाई नुसते सौदर्यातच भर पाडते असे नाही. या हिरव्या हिरव्या मखमलीमध्ये अनेक अशा वनस्पती, तृण आहे की जे माणसाच्या सेवनासाठी उत्तम आहे. तुम्हाला कधी डोंगर द-यांमध्ये फोडशी दिसली जरे असेल तरीही असे वाटले नसेल की या गवताच्या पातीची छान भाजी देखील बनवता येते. पाऊसकाळ सुरु झाला की लगेच हे तृण जमिनीतुन वर डोकावते. दोनच आठवड्यांत यास सुंदर पांढरी फुले देखील येतात. फुले आलेल्या पात्यांची भाजी करीत नाही. केवळ कोवळी पातीच वापरतात. देशी, दुर्मिळ वनस्पती अभ्यासक श्री वसंत काळे यांनी फोटोच्या माध्यमातुन फोडशी / कोलु ची भाजी करायची पध्दती सांगितली आहे ती तशीच्या तशी तशी मी येथे देतो. यास सफेद मुसळी असे देखील म्हणतात.
कुरडू भाजी
पाऊस पडायला सुरुवात झाली की लगे्चच रानोमाळ उगवणारी ही रानभाजी, अनेकांना माहीतच नसते. तन म्हणुन यास शेतातुन काढुन फेकले जाते. या वनस्पतीला जेव्हा फुले येतात तेव्हा ती सर्वांचे लक्ष वेधुन घेते. फुलाचा तुरा अगदी कोंबड्याच्या तु-यासारखाच दिसतो. यामुळेच की काय या वनस्पतीस काही ठिकाणी कोंबड-कुरडू असेही म्हंटले जाते.
इंग्रजीमध्ये या वनस्पतीला Silver Cockscomb असे म्हणातात, तर संस्कृतमध्ये ‘मयुरशिखा’ असे नाव आहे. भारतात सर्वत्र, तर आशिया खंडातील अनेक देशांमध्ये ही वनस्पती आढळली आहे. शेताच्या आजूबाजूला कुर्डू असल्यास त्यामुळॆ फुलपाखरे आकर्षित होऊन त्याचा परागीभवनासाठी भातशेतीला फायदा होतो असे काही अभ्यासक सांगतात. या वनस्पतीचे अनेक औषधी उपयोग आहेत.
भाजी करण्याची पध्दत अतिशय सोपी आणि नेहमीची आहे. मेथीची भाजी जशी आपण करतो अगदी तशीच याच्या पानांची भाजी करावी.
पाने शक्यतो खुडून घ्यावीत (उपटुन काढु नये) म्हणजे पुन्हा पाने फांद्या येऊन, नवरात्रापर्यंत फुलोरा म्हणजेच तुरे येऊन पुढील वर्षासाठी उगवणीची देखील सोय होईल.
✍️ शेतकरीकन्या वैष्णवी निमकर 💚
B.Sc.Agriculture
Comments
Post a Comment