भुईमूग लागवड तंत्रज्ञान
भुईमुगाचे महत्त्व :
✓भुईमुगाची खरीप हंगामातील उत्पादकता सुमारे १००० किलो तर उन्हाळी हंगामात १४०० किलो प्रति हेक्टर आहे.
✓खरिपातील उत्पादकता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. देशातील एकूण उत्पादनापैकी ८० टक्के तेलासाठी, १० टक्के प्रक्रिया करून खाणे व १० टक्के निर्यातीसाठी वापरले जाते.
✓दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रथिने (२५ टक्के) आहेत.
✓महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फळबागांची लागवड तसेच कापसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये आंतरपीक घेऊन उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर करता येणे शक्य आहे.
लागवड तंत्रज्ञान :
जमीन :
✓भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते.
✓या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.
हवामान :
• हे पीक उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील आहे.
•भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते.
पूर्वमशागत :
✓भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुळांवरील गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच शेंगा जमिनीत चांगल्या पोसण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत हवी.
✓त्यासाठी जमिनीची मशागत चांगली होणे आवश्यक आहे. त्यासाठी १५ सें.मी. खोल नांगरट करून घ्यावी.
✓ कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीआधी ७.५ टन प्रतिहेक्टरी शेणखत मिसळावे.
✓याप्रमाणात शेणखत वा कंपोस्ट खत शेतात पसरवून द्यावे. जेणेकरून कुळवणी केल्याने ते चांगले पसरले जाईल.
पेरणीची वेळ : खरिपात पेरणी जून-जुलै महिन्यांत मॉन्सून सुरू होण्याच्या वेळेवर अवलंबून असते.
भुईमुगासाठी पेरणी जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी.
भुईमुगाबरोबर आंतरपिके :
भुईमुगापासून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शाश्वती नसल्यास
भुईमूग+तीळ (६ः२),
भुईमूग + सूर्यफूल (६ः२),
भुईमूग + कापूस (२ः१),
भुईमूग + तूर (६ः२)
या प्रमाणात पेरणी करून दोन्ही पिकांचे अधिक उत्पादन घेणे शक्य होते, तसेच भुईमूग फळबागांमध्ये आंतरपीक घेतल्यास फळबागेस फायदा होतो.
बियाणे प्रमाण :
✓पेरणीकरिता सुमारे १०० ते १२५ किलो प्रतिहेक्टरी बियाणे लागते. परंतु,
✓बियाण्याचे प्रमाण ठरविताना पेरणीकरिता निवडलेला वाण, हेक्टरी रोपांची संख्या, बियाण्यांचे १०० दाण्यांचे वजन, उगवणक्षमता व पेरणी अंतर आदी बाबींचा विचार करावा.
*यासाठी एसबी ११, टीएजी २४ या उपट्या वाणांसाठी १०० किलो, तर फुले प्रगती, टीपीजी ४१, जेएल ५०१ या वाणांसाठी १२५ किलो बियाणे पुरते. निमपसऱ्या व पसऱ्या वाणांसाठी ८० ते ८५ किलो बियाणे वापरावे.
बीजप्रक्रिया :
✓रोपावस्थेत उद्भवणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी
✓किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा या बुरशीजन्य घटकाची पाच ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी,
✓तसेच प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम व पीएसबी या जीवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून मगच पेरणीसाठी वापरावे.
पेरणी अंतर :
सपाट वाफा पद्धती :
1) सपाट वाफा पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणीयंत्राच्या साह्याने दोन ओळींतील अंतर ३० सेंमी व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे. जेणेकरून हेक्टरी ३.३३ लाख इतकी रोपांची संख्या ठेवता येईल.
2)टोकण पद्धतीने लागवड केल्यास बियाण्याची २५ टक्के बचत होते. पेरणीच्या वेळी बारीक बियाणे बाजूला काढणे शक्य होऊन प्रतिहेक्टरी ३.३३ लाख रोपे मिळतात. पेरणी पाच सेंमी खोलवर करावी.
पेरणी पद्धत : भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर किंवा रुंद सरी वरंबा पद्धतीने करता येईल.
सपाट वाफा पद्धत :
✓ पेरणी सपाट वाफ्यावर करायची झाल्यास ३० सेंमी अंतर असलेले पेरणीयंत्र वापरून वाफशावर पेरणी करावी किंवा बियाणे टोकून पेरणी करावी.
✓पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर ३० सेंम तर दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे व पाणी द्यावे.
✓ त्यानंतर ७-८ दिवसांनी न उगवलेल्या जागी नांग्या भरून घ्याव्यात.
✓इक्रिसॅट पद्धतीने लागवड ः या पद्धतीस रुंद वाफा पद्धत म्हणतात.
इक्रिसॅट पद्धतीचे फायदे :
✓गादीवाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादनात वाढ होते.
✓जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते त्यामुळे पिकाची कार्यक्षमता वाढते.
पिकास पाण्याचा ताण बसत नाही, तसेच जास्त पाणी दिल्यामुळे सरीतून पाण्याचा निचरा करता येतो.
✓तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते.
✓या पद्धतीत पाटाने पाणी देता येते. यासाठी वेगळी रानबांधणी करावी लागत नाही.
✓संतुलित खत व्यवस्थापन केल्याने अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिसणार नाहीत व योग्य प्रकारे पिकाची वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.
सेंद्रिय खते :
१) ७.५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रतिहेक्टरी पूर्वमशागत करताना शेवटच्या कुळवणीआधी जमिनीत चांगले मिसळून द्यावे.
२)शेणखत किंवा कंपोस्ट खतांमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढून जमीन भुसभुशीत होते.
३)त्याचबरोबर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, तसेच जमिनीतील लाभदायक सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढून जमिनीचे आरोग्य चांगले राखले जाते,
४) शेणखतातून महत्त्वाच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन पीकवाढीवर चांगला परिणाम दिसून येतो.
रासायनिक खते :
✓खरीप हंगामात पेरणीवेळी २५ किलो नत्र (युरिया खतातून), ५० किलो स्फुरद (एसएसपी खतातून) प्रतिहेक्टरी द्यावे. भुईमुगास नत्र व स्फुरद ही महत्त्वाची अन्नद्रव्ये आवश्यक असतात.
✓त्याचबरोबर गंधक व कॅल्शिअम ही दुय्यम अन्नद्रव्ये भुईमुगासाठी द्यावी लागतात. त्यामुळे स्फुरद हे अन्नद्रव्य एसएसपी खतातून द्यावे.
✓पेरणीवेळी २०० किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे, तर उर्वरित २०० किलो जिप्सम हे आऱ्या सुटताना द्यावे.
✓जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते व एकूणच उत्पादन वाढते. उन्हाळी भुईमुगासाठी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ४०० किलो जिप्सम असे प्रमाण ठेवावे.
अन्नद्रव्ये शिफारसी :
✓अन्नद्रव्य : नत्र किलो प्रति हेक्टर) : २५
✓अन्नद्रव्य : स्फुरद (किलो प्रति हेक्टर) : ५०
✓अन्नद्रव्य : जिप्सम (किलो प्रति हेक्टर) : ४००
✓अन्नद्रव्य : लोह (किलो प्रति हेक्टर) २०
✓अन्नद्रव्य : जस्त (किलो प्रति हेक्टर) २०
✓अन्नद्रव्य : बोरॉन (किलो प्रति हेक्टर) ५
जैविक खते :
✓भुईमूग हे द्विदलवर्गीय पीक असल्याने तसेच त्याच्या मुळावरील गाठींमुळे ते वातावरणातील नत्र वायू जमिनीत स्थिर करण्यास मदत होते.
✓त्यासाठी रायझोबियम या जैविक खताची बीजप्रक्रिया करण्यासाठी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणात वापरण्याची शिफारस आहे.
✓स्फुरदाची उपलब्धता वाढविण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या (पीएसबी) खताची बीजप्रक्रिया करावी.
सूक्ष्म अन्नद्रव्ये :
लोह :
✓ज्या जमिनीत लोह कमी आहे अशा जमिनीत २० किलो प्रतिहेक्टरी फेरस सल्फेट द्यावे.
✓लोहाची कमतरता दिसून आल्यास २.५ किलो प्रति हेक्टर फेरस सल्फेटची फवारणी करावी.
जस्त :
जस्त कमी असलेल्या जमिनीत २० किलो प्रतिहेक्टरी झिंक सल्फेट प्रतिहेक्टरी द्यावे. २.५० किलो प्रतिहेक्टरी फवारणीद्वारे द्यावे.
बोरॉन : ५ किलो बोरॉन प्रति हेक्टरी पेरणीवेळी द्यावे किंवा ०.१ टक्का फवारणी करावी.
आंतरमशागत :
भुईमुगाचे पीक ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवण्यासाठी दोन खुरपण्या १५-२० दिवसांच्या अंतराने व दोन कोळपण्या १०-१२ दिवसांच्या अंतराने कराव्यात.
✓३५-४० दिवसांनंतर आऱ्या सुटू लागल्यानंतर कोणतेही आंतरमशागतीचे काम करू नये. फक्त मोठे तण उपटून टाकावे म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढेल.
तणनाशकाचा वापर :
तणनाशकाचा वापर करून निंदणी व दोन कोळपण्या दिल्या तर तणांचा चांगला बंदोबस्त होतो.
तणनाशकांची शिफारस :
पेरणीनंतर ४८ तासांच्या ओलीवर : पेडीमिथॅलिन सात मिली प्रति लिटर पाणी
पेरणीनंतर २० दिवसांनी-
तण उगवणीनंतर :
इमॅझिथापर (१० टक्के एसएल) दाेन मिली प्रति लिटर पाणी
पाणी व्यवस्थापन :
खरीप भुईमुगासाठी ४० ते ५० सें.मी. तर उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सेंमी पाणी लागते. परंतु प्लॅस्टिक आच्छादित तंत्रामुळे ४०-५० टक्के पाण्याची बचत होते. तुषार सिंचन पद्धत ही प्लॅस्टिक आच्छादन तंत्राने घेतलेल्या भुईमुगासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. जी पीकवाढीसाठी उपयुक्त ठरते. तसेच तुषार सिंचनाने समान पद्धतीने पाणी देता येते.
कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन :
मावा, फूलकिडे, तुडतुडे- प्रादुर्भाव दिसताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी.
दुसरी फवारणी १५ दिवसांनंतर-
डायमिथोएट- ५०० मि.लि. प्रति ५०० लिटर पाण्यातून फवारणी (प्रतिहेक्टरी )
पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळी- क्विनॉलफॉस (२५ ईसी) २० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी.
गरजेनुसार शिफारसीत कीटकनाशकांच्या पुढील फवारण्या कराव्यात.
✓टिक्का रोग नियंत्रण :
मॅन्कोझेब २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
✓तांबेरा रोग नियंत्रण- हेक्साकोनॅझोल १ मिली प्रति लिटर पाणी प्रति
या प्रमाणे फवारणी करावी.
काढणी :
✓भुईमुगाचा पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगाचे टरफल टणक बनून आतल्या बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी.
✓काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात. त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८-९ टक्क्यांपर्यंत खाली आणावे.
उत्पादन : सुधारित पद्धतीने भुईमुगाची पेरणी योग्य पद्धतीने संतुलित खतांचा वापर, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण केल्यास
भुईमुगाच्या सुधारित वाणांपासून
हेक्टरी
✓२०-२५ (खरीप),
तर ३०-३५ (उन्हाळी) क्विंटल वाळलेल्या शेंगा तसेच ४-५ टन कोरडा पाला मिळण्यास काहीच हरकत नाही.
✍️वैष्णवी निमकर
B.Sc.( Hons) Agriculture ❤️
नाद एकच शेती⚔️🌾💚
Comments
Post a Comment