शेवगा आरोग्यासाठी वरदान
शेवग्याच्या शेंगांची लांबी साधारण ५० ते ६० सेंमी असावी. त्यात भरपूर गर असावा. कडवट चव असणाऱ्या शेंगाना जास्त बाजारभाव मिळत नाही.
- शेंगा काढल्यानंतर त्याचा तजेला २ ते ३ दिवस टिकून राहणे अपेक्षित असते. बऱ्याच वेळा शेंगा लवकर पोचट होतात.
- दोन्ही हंगामात भरपूर शेंगा देणारे असे शेवग्याचे झाड निवडून त्याच्या फाटे वापरून लागवड केल्यास चांगले उत्पादन देणारा वाण मिळण्यास मदत होते.
लागवडीसाठी जाती
शेवगा पीक बहुपयोगी असले तरी त्यावर विशेष असे संशोधन झाले नाही. त्यामुळे हे पीक काहीसे दुर्लक्षित राहिलेले आहे. शेवगा पिकामध्ये फारशा जाती उपलब्ध नाहीत. परंतु अनेक खेड्यांमध्ये आणि विविध विभागांत वाढणाऱ्या झाडांच्या शेंगांमध्ये चव आणि रंग याबाबत विविधता आढळून येते.
सध्या तमिळनाडू कृषी विश्वविद्यालय, कोइमतूर या संस्थेने कोइमतूर- १, कोइमतूर -२, पी.के.एम.- १ आणि पी. के. एम.-२ या लवकर शेंगा येणारे व भरपूर प्रथिने असलेले वाण प्रसारित केले आहेत.
दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ‘कोकण रुचिरा’ हे वाण प्रसारित केले आहे. या जातीचे झाडे ५ ते ६ मीटर उंच असून साधारण १६ ते २२ फांद्या असतात. तसेच बागलकोट (कर्नाटक) येथील विद्यापीठाने ‘भाग्या’ ही जात चांगल्या उत्पादनासाठी विकसित केली आहे.
जमीन व हवामान
शेवगा पीक कोणत्याही हवामानात वाढू शकते. लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते.
पावसाचे प्रमाण चांगले असलेल्या डोंगर उतारावरील हलक्या जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो.
कोकणातील शेवगा लागवड ही फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली दिसून येते.
तर पश्चिम महाराष्ट्रातील जमिनीत झाडे कोरडवाहूच आढळतात. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील भारी काळ्या जमिनीत झाडे उंच वाढतात, पानांची वाढ जास्त असते. झाडांना ताण चांगला बसत नाही. त्यामुळे फुलांचे आणि शेंगांचे प्रमाण कमी होते
लागवड
- पावसाळ्यापूर्वी ६० सेंमी लांब, रुंद आणि खोल खड्डे काढावेत. खड्डे चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, १५:१५:१५ हे खत २५० ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा ५० ग्रॅम यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत.
- व्यापारी तत्त्वावर शेवगा लागवड करावयाची असल्यास, दोन झाडांत व ओळींत अडीच ते ३ मीटर अंतर राखावे.
- शेवग्याची अभिवृद्धी फाटे कलम व बियांपासून रोपे तयार करून केली जाते. परंतु, बियांपासून लागवड केल्यास मातृवृक्षाप्रमाणे गुणधर्म असलेली झाडे मिळत नाहीत. फाटे कलमांच्या तुलनेत बिया लागवडीपासून तयार केलेल्या झाडांना ३ ते ४ महिने उशिरा शेंगा लागतात.
- फाटे कलमापासून लागवडीसाठी ५ ते ६ सेंमी जाडीच्या सुमारे १ ते १.२५ मीटर लांबीच्या फांद्या वापरतात.
लागवड हंगाम
- कमी पावसाच्या प्रदेशात जून- जुलै महिन्यात पहिल्या पावसानंतर वातावरणात अनुकूल बदल होतात. हवेतील आर्द्रता वाढते. असे वातावरण फाटे कलम फुटण्यास किंवा रोपे रुजण्यास अनुकूल असते. त्यामुळे या काळात लागवड करणे फायदेशीर ठरते.
- फाटे कलम किंवा रोपे लावल्यावर त्याजवळील माती पायाने चांगली दाबावी व हातपाणी द्यावे.
- लागवडीनंतर ६ ते ८ महिने आवश्यकतेनुसार पाणी देऊन झाडे जगवावीत. सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर देखील करता येतो.
- झाडाच्या प्रत्येक खड्ड्यात २ ते ३ लिटर पाणी बसेल अशा क्षमतेचे मडके जमिनीत गळ्यापर्यंत गाडावे. त्यामध्ये ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी टाकावे. मडक्याच्या तळाशी लहान छिद्र आणि त्यात कापडाची लहान चिंधी घातलेली असावी.
- झाडे लहान आहेत तोवरच झाडांना पाण्याची गरज भासते. झाडे मोठी झाल्यावर पाण्याची गरज भासत नाही.
- आंतरपीक म्हणूनही शेवगा लागवड करता येते.
आंबा, चिकू, जांभूळ व फणस इत्यादी फळपिकांच्या लागवडीमध्ये पहिली ५ ते ६ वर्ष आंतरपीक म्हणून शेवगा घेता येतो.
आंतरमशागत, प्रमाणित खतांचा वापर, झाडाची योग्य छाटणी या बाबींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शेवगा लागवडीत विशेष आंतरमशागत करावी लागत नाही. मात्र, झाडांची आळी वेळोवेळी खुरपून तण काढून स्वच्छ करावीत.
- दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी. म्हणजे तणांचा उपद्रव होणार नाही. शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाते.
- दरवर्षी प्रत्येक झाडास पावसाच्या सुरवातीस १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद (३१२ ग्रॅम सुपर फॉस्फेट) व ७५ ग्रॅम पालाश (१२० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) याप्रमाणे रासायनिक खतमात्रा द्यावी.
छाटनी
शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्यक आहे. व्यवस्थित आकार न दिल्यास झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणे अवघड होऊन जाते.
- लागवडीनंतर २ ते अडीच महिने किंवा मुख्य खोड ३ ते ४ फूट झाल्यानंतर पहिली छाटणी करावी. यावेळी खोड जमिनीपासून १ मीटर अंतरावर छाटावे. चार दिशांना चार फांद्या वाढू द्याव्यात. यामुळे झाडांची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाते.
- त्यानंतर ३ ते ४ महिन्यांनी चारही फांद्या मुख्यः खोडापासून एक मीटर अंतरावर छाटाव्यात. त्यामुळे झाडाचा मुख्यः आराखडा तयार होण्यास मदत होते. तसेच झाडाची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे होते. त्यानंतर पुढे दर दोन वर्षांनी एप्रिल-मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी. म्हणजे झाड नियमित उत्पादन देईल.
✍️vaishnavi Nimkar
नाद एकच शेती ❤️ ⚔️ 👑
B.Sc.Agriculture
Comments
Post a Comment